झी 24 ताससाठी नागपूरहून अखिलेश हळवे
राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचं होमपीच...निवडणुक महापालिकेची असो की झेडपीची...तिथंल यशापयश नाही म्हटलं तरी गडकरींच्या खात्यात जमा होतं. त्यामुळंचं भाजपनं नागपूर झेडपीची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. तर त्याला टक्कर देण्यासाठी दोन्ही काँग्रेस सज्ज झाले आहेत.
राज्यात 2007 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या काही मोजक्या जिल्हा परिषदांमध्ये युतीची सत्ता आली होती त्यामध्ये नागपूर जिल्हा परीषदेचाही समावेश होता. मात्र फार काळ त्यांना सत्तेची चव चाखता आली नाही. भाजपचे जिल्हा परीषद सदस्य सुरेश भोयर साथीदारांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि काँग्रेस राष्ट्रवादाची जिल्हा परिषदेत सत्ता आली.
2007 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत 59 जागांपैकी भाजपला 24 तर शिवसेनेला 4 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसनं 14, राष्ट्रवादीनं 11 तर अपक्ष आणि इतरांनी 6 जागा जिंकल्या होत्या. जिल्ह्या परिषदेत एकत्र सत्ता उपभोगलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आता स्वबळाची भाषा करतायेत.
सत्ता बदलाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या भाजप शिवसेनेनं पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसलीय. मात्र सत्तेची स्वप्न बघताना त्यांच्यातल्या जागावाटपाचा तिढा मात्र अजून संपलेला नाही.
नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिलीच झेडपीची निवडणूक आहे. ही निवडणुक स्थानिक पातळीवर आणि स्थानिक प्रश्नांवर लढली जात असली तरी गडकरींसाठी नक्कीच महत्वाची आहे. त्यामुळं या निवडणुकीत ते पूर्ण ताकद लावतील यात शंका नाही. तर गडकरींची कोंडी करण्यासाठी काँग्रेस राष्ठ्रवादीनंही जोरदार फिल्डिंग लावलीय. त्यामुळं नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालाकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.