अखिलेश यादव यूपीचे मुख्यमंत्री

अखिलेश यादव आज उत्तर प्रदेशच्य़ा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. युपीचा आजवरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सपाच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यांचं नाव निश्चित करण्यात आले होते.

Updated: Mar 15, 2012, 03:36 PM IST

www.24taas.com, लखनऊ

 

 

अखिलेश यादव आज उत्तर प्रदेशच्य़ा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. युपीचा आजवरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सपाच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यांचं नाव निश्चित करण्यात आले होते.

 

 

उत्तरप्रदेशमध्ये बसपाच्या हत्तीला मागं टाकत सपाच्या सायकलला विजयी करण्यात अखिलेशचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे खुद्द मुलायमसिंग यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेशच्या नावाचा आग्रह धरला होता. देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे ३३ वे आणि सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव यांची नोंद झाली आहे.  येथील लामाटिनिअर कॉलेज मैदानावर आज सकाळी अकरा वाजता अखिलेश यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या समारंभाला सुमारे ५० हजार लोक उपस्थित राहण्याचा अंदाज ठेवून गेल्या दोन-तीन दिवसांपासून मैदानावर मंडप उभारणी व इतर व्यवस्थेसाठी एकहजार मजूर काम करत होते. जागोजागी एलईडी टीव्ही, तसेच सुरक्षेसाठीसीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

 

 

या शानदार समारंभासाठी सुमारे पाचकोटी रुपये खर्च केल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या सरकारीनिवासस्थानासमोरील कालिदास मार्गालगतच हा समारंभ होत आहे. मायावतींनीत्यांच्या कारकिर्दीत जनतेसाठी बंद केलेला रस्ता खुला करण्याचे आदेश अखिलेश यांनी दिले होते.  राज्याची धुरा अखिलेश यांच्या हाती सोपवण्यात आली असली तरी त्यांचे सहकारी मंत्री, तसेच अधिकारी कोण असतील, यावर मुलायमसिंह यांचाच प्रभाव असणार असल्याची माहिती पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.

 

 

 काय म्हणालेत, नवे मुख्यमंत्री

अखिलेश यांनी स्वच्छ आणि प्रामाणिक मंत्री आणि अधिकाऱ्यांना प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केल्याने यादी तयार करताना मुलायमसिंह यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचेही या नेत्याने सांगितले. मंत्रिमंडळात जुन्या आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधला जाईल. समाजातील सर्व स्तर आणि धर्मांतील प्रतिनिधींचा त्यात समावेश असेल, असे नव्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार केले जाईल, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.