जनलोकपालसाठी टीम अण्णांची निर्मिती झाली असून, कोअर कमिटी बरखास्त करण्याचा प्रश्नच नाही. असं सांगत कोअर कमिटीतल्या बदल्याच्या प्रश्नांना टीम अण्णानं पूर्णविराम दिलाय. टीम अण्णाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक गाझियाबादमध्ये पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. कुमार विश्वास यांच्या पत्रानं कोअर कमिटीच्या विस्ताराचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. मात्र कोअर कमिटीत बदल होणार नसल्याचं टीम अण्णाकडून स्पष्ट करण्यात आलय. सरकारी यंत्रणेचा टीम अण्णाविरोधात दुरुपयोग सुरु असून, टीम अण्णा या हल्ल्यांना उत्तर देईल, असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलय. हिसारमध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचार योग्यच असल्याचं मत या कोअर कमिटीच्या बैठकीत नोंदवण्यात आल. आंदोलनासाठी आलेल्या पैशांचा गैरवापर झाला नसल्याचंही टीम अण्णांनं स्पष्ट केलय. येत्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल मंजूर करण्यासाठी टीम अण्णा आग्रही असल्याचंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलय. लोकपाल मंजूर झालं नाही, तर येत्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांत आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. या बैठकीबाबत अण्णांना माहिती देण्यासाठी केजरीवाल आणि प्रशांत भूषण उद्या राळेगणसिद्धीत जाणार आहेत.