टीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'

आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.

Updated: Jul 27, 2012, 04:42 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.

 

टीम अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बाबा रामदेव आज जंतरमंतरवर पोहचले. यावेळी त्यांचा करिष्मा इथं दिसून आला. ‘अण्णा-बाबा साथ साथ’चा नारा देणारे बाबा रामदेव टीम अण्णांच्या उपोषणाचे पहिले दोन दिवस गैरहजर राहिले. अर्थातच बाबांची अनुपस्थिती हा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. पण, बाबा रामदेवांनी आज मैदानात हजेरी लावली आणि जंतरमंतरवर थोड्याच वेळात जनसागर उसळला. त्यामुळे अण्णांसहित टीम अण्णांनाही बळ मिळालं.

 

‘भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं असेल तर देशाची लोकसंख्या कमीत कमी सव्वा लाख असायला हवी, एवढ्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय देशात क्रांती अशक्य आहे’, असं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. ‘झी न्यूज’च्या प्रतिनिधींशी बोलताना बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलंय.

 

अण्णांच्या आंदोलनात गर्दी खेचून आणण्यासाठी बाबा रामदेवांनी जंतरमंतरवर हजेरी लावल्याची चर्चाही जोरात रंगतेय. पण, बाबा रामदेवांना आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आमंत्रण धाडणं टीम अण्णामधल्या अनेक सदस्यांना पसंत नाही. पण, एव्हढं मात्र खरं की, बाबा रामदेवांच्या हजेरीमुळे जंतरमंतरवर पुन्हा गर्दी दिसून आली. त्यामुळे बाबांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला नवचेतना मिळू शकते, असं काहींना वाटतंय.

 

टीम अण्णांनी आंदोलनाला पाठिंबा मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. पण वेगवेगळ्या चर्चांमुळे टीम अण्णामधील अनेक सदस्य अनेक वादांत अडकलेत. साहजिकच त्याचा परिणाम आंदोलनावर दिसून येतोय. गेले दोन दिवस जंतरमंतरवर लोकांची तुरळक उपस्थिती दिसून आली. त्यातच आज सकाळी टीम अण्णा कार्यकर्त्यांनी काही पत्रकारांबरोबर धक्का बुक्की केली. यामध्ये काही महिला पत्रकारांचाही समावेश होता.

 

.