पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून या दरम्यान टीम अण्णाच्या सदस्यांच्या वर्तणुकीकडे केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी दिली. टीम अण्णाचा एखाद्या विशिष्ट पक्षाच्या विरोधातला प्रचार हा औचित्याचा मुद्दा होऊ शकतो, असं कुरेशी यांनी सांगितले.
पाच राज्यांतील निवडणुकांवेळी इतर राजकीय पक्षांप्रमाणे टीम अण्णावरही करडी नजर असणार असल्याचे कुरेशी यांनी स्पष्ट केले. कुरेशी म्हणाले, ‘विशिष्ट पक्षाला मते द्या किंवा देऊ नका असे त्यांनी आवाहन केलेले नाही. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत तरी कोणत्याही निवडणूक कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. कायद्याचे उल्लंघन झालेले नसले तरी भविष्यात औचित्याचा मुद्दा होऊ शकतो, याची टीम अण्णाला जाणीव असावी, अशीच आमची इच्छा आहे.
मणिपूर, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गोव्यात जानेवारी २८ ते मार्च ३ पर्यंत विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर टीम अण्णा काँग्रेस विरोधात प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून कुरेशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.