www.24taas.com, पटना
बिहारची राजधानी पटनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेत देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं खातं अजूनही जिवंत आहे. एका अधिका-याने बुधवारी ही माहिती दिलीय. गेल्या ५० वर्षांपासून हे खातं सुरू असल्याचं या अधिका-यानं सांगितलंय.
राजेंद्र प्रसाद यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या एक्झिबिशन रोड शाखेत २४ ऑक्टोबर १९६२ रोजी एक बचत खातं सुरू केलं होतं. यानंतरच्या अवघ्या काही महिन्यांमध्ये राजेंद्र प्रसाद यांचं निधन झालं. बँकेच्या मुख्य प्रबंधक गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. राजेंद्र प्रसाद यांना या बँकेच्या प्रथम ग्राहकाचा दर्जा दिला गेला होता. ही या बँकेसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट ठरलीय. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या बँक खात्यात यावेळी व्याजासहित एकुण १,८१३ रुपये जमा आहेत. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे काढण्यासाठी आत्तापर्यंत कुणीही या बँकेशी संपर्क साधलेला नाही. प्रत्येक सहा महिन्यानंतर या बँकेकडून या खात्यात व्याजाचे पैसे जमा केले जातात.
बँकेच्या या शाखेत डॉ. राजेंद्र प्रसाद याचं खाते क्र. ०३८००००१०००३०६८७ त्यांच्या छायाचित्रासहित प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४मध्ये बिहारच्या सीवान जिल्ह्यातल्या ‘जीरादेई’ या गावात झाला होता. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी पटनामध्ये त्यांचं निधन झालं. १९५२ पासून १९६२ पर्यंत त्यांनी भारताचं राष्ट्रपतीपद भूषविलं.