अमृतसर शारजा इथे २००९ साली एका पाकिस्तानी नागरिकाचा खून केल्या प्रकरणी अटकेत असलेलं चार युवक सुटकेनंतर शुक्रवारी रात्री उशीरा अमृतसरला पोहचले. राकेश कुमार, सुखपाल सिंग, चरणजीत आणि रसिंवदर पाल हे गेली दोन वर्षे शारजाच्या तुरुंगात अटकेत होते. पाकिस्तानी नागरिकाच्या वारसदाराला रोख नुकसानभरपाई दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. भारतीय पंजाबी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एस.पी.सिंग ओबेराय हे या चार युवकांना घेऊन परतले. पाकिस्तानी नागरिक मिसरी नझिर खानच्या नातेवाईकांनी या चौघांना फाशीची शिक्षा ठोठावली जाऊ नये या विनंतीचा स्वीकार केल्यानंतर शारजा न्यायालयाने त्यांच्या सुटके संदर्भातली याचिका दाखल करुन घेतली.
शारजा न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाच्या हत्ये प्रकरणी २८ मार्चे २०१० रोजी १७ भारतीय नागरिकांना फाशीची शिक्षा ठोठावली. पण कोर्टाबाहेर चार कोटी ३६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यावर तडजोड झाल्याने या भारतीय नागरिकांना जीवदान मिळालं. या प्रकरणातील अजून चार कैद्यांची कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने सुटका होणं बाकी असल्याचं ओबेराय यांनी सांगितलं. भारतीय दुतावासाने या चौघांना एका दिवसात तात्पूरते पासपोर्ट जारी केल्याने त्यांना तात्काळ भारतात परतणं शक्य झालं.