त्रिवेदींचे जाणे दु:खदायक - पंतप्रधान

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचं राजीनामा नाट्य अखेर संपल. त्रिवेदींचा राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवल्याचं पंतप्रधानांनी लोकसभेतल्या निवेदनात स्पष्ट केले. त्रिवेंदीच्या गच्छतींबाबत दु:ख झाल्याचंही पंतप्रधानांनी नमूद करत ममतांना टोला लगावला.

Updated: Mar 19, 2012, 02:15 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचं राजीनामा नाट्य अखेर संपल. त्रिवेदींचा राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवल्याचं पंतप्रधानांनी लोकसभेतल्या निवेदनात स्पष्ट केले. त्रिवेंदीच्या गच्छतींबाबत दु:ख झाल्याचंही पंतप्रधानांनी नमूद करत ममतांना टोला लगावला.

 

 

प्रवासी रेल्वे भाडेवाढीवरून स्वपक्षीयांकडूनच मोठा विरोध झाल्यानंतर नाराजी ओढावून घेणारे रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचा राजीनामा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेर स्वीकारला आहे. तसेच तो राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज लोकसभेत दिली. रेल्वेमंत्री या नात्याने दिनेश त्रिवेदी यांनी बुधवारी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यात प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली होती. त्याला त्यांच्याच पक्षाने म्हणजे तृणमूल काँग्रेसने व पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता.

 

 

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना रेल्वे भाववाढ चांगलीच महागात पडली आहे. कारण की, त्यामुळे त्यांचं मंत्रीपद गमवावं लागलं आहे. तसचं भाववाढ केल्याने त्यांच्याविरोधात बोलले जात आहे. तर दुसरीकडे राजीनामा द्यावा लागलेल्या दिनेश त्रिवेदींनी मी कुणाचाही प्यादा नसल्याचं म्हटलं आहे. दिनेश त्रिवेदींनी पंतप्रधान मनमोहन सिंग सर्वात चांगले पंतप्रधान असल्याचं सांगितलं आहे. रेल्वे बजेट सादर केल्यानंतर ममता बॅनर्जींनी दिनेश त्रिवेदींवर हल्लाबोल करत ते काँग्रेसच्या गेम प्लानचा प्याद असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली होती.

 

 

रेल्वे भाडेवाडीमुळं रेल्वेमंत्रीपद गमावलं असलं तरी तृणमूल काँग्रेस दिनेश त्रिवेदींवर कारवाई करणार नाही. तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. मुकुल रॉय यांचं नाव रेल्वेमंत्रीपदासाठी निश्चित केलं जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीत त्रिवेंदीवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र त्रिवेदींवर कारवाई करणार नसल्याचं तृणमूलच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं.

 

 

दरम्यान,  तृणमूल काँग्रेसकडून त्रिवेदी यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र आपल्याला पंतप्रधान मनमोहन सिंग व पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सांगितल्यानंतर राजीनामा देऊ असे सांगत रेल्वेमंत्रालय कोणाची जहागिरीदारी नाही, असे त्रिवेदी यांनी स्पष्ट करीत पक्षातंर्गत विरोधकांना आव्हान दिले होते. मात्र रविवारी सायंकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे सोपविला होता. तसेच ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार आरण राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.