तारिख होती १२ डिसेंबर १९११ तेंव्हाचे भारताचे अधिपती पंचम जॉर्ज यांनी ब्रिटीश राजवटीच्या राजधानी दिल्ली असल्याचे घोषित केलं. दिल्ली शहराला हरवलेलं गतवैभव परत प्राप्त झालं. त्याआधी इस्ट इंडिया आणि ब्रिटीश सरकारचाही कारभार कोलकात्यावरुन चालायचा.
दिल्ली शहराच्या स्थापनेचा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन दिल्ली सरकारने आणि इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स यांनी देखील आयोजीत केले आहेत. तसचं या निमित्ताने खास प्रदर्शनांचेही आयोजन करण्यात येणार आहे आणि सॉवेनियर्सही प्रकाशीत करण्यात येणार आहेत.दिल्लीच्या सात शहरांच्या इतिहासावर आधारीत एका पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पुस्तकात शहराची उभारणी कशी करण्यात आली त्याचेही तपशीलवार लिखाण करण्यात आले आहे.
शहरातील स्मारक तसंच प्रेक्षणीय स्थळांचे चित्र प्रदर्शनही सरकारने आयोजीत केलं आहे.दिल्लीचे लेफ्टनंट गर्व्हनर तेंजेंद्र खन्ना दास्ताँ ए दिल्ली या प्रदर्शनाचे उदघाटन करणार आहेत. दिल्लीतील बाबा खडक सिंग मार्गावर फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली के पकवान फूड फेस्टिव्हमध्ये कबाब, कुल्फी आणि शहराच्या स्ट्रीट फूडची लज्जत लोकांना चाखायला मिळणार आहे. दिल्लीला जवळपास ३००० वर्षांचा इतिहास आहे, अनेक साम्राज्यांची राजधानी राहण्याचा मान या शहराला प्राप्त झाला आहे. दिल्ली शहरावर अनेक राजवटींच्या वारशाचा ठसा दिसून येतो. नव्या दिल्लीची पायाभरणी पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरी यांच्या हस्ते १५ डिसेंबर १९११ रोजी करण्यात आली. दिल्लीच्या जडणघडणीत एडवीन लुट्येन्स आणइ हरबर्ट बेकर यांनी आपली अमीट नाममुद्र उमटवली.