www.24taas.com, मुंबई
राष्ट्रीयकृत बँकांनी एक अफलातून निर्णय घेऊन ग्राहकांना दणका दिला आहे. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक नोटा मोजण्यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र आपलेच पैसे मोजण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्यानं ग्राहकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
बँकेत पैसे भरायला जाणार असेल. तर थोडं थांबा आणि आपल्याकडे बँकेत मर्यादेपेक्षा अधिक नोटा आहेत का हे पाहून घ्या. कारण या बँकांमध्ये एकापेक्षा अधिक नोटांचे बंडल मोजण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. स्टेट बँक ऑफ इंडियात एक हजार नोटांसाठी शंभर रुपये, इतर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पन्नास रुपये दर आकारण्यात येत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एप्रिल महिन्यापासून ही वसूली सुरु करण्यात येणार आहे.
या वसूलीतून बँका दररोज लाखोंची कमाई करत आहे. आपलेच पैसे मोजण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्यानं व्यापारी हैराण झाले आहेत. आता याविरोधात रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. हा धोरणात्मक निर्णय असून सामान्य खातेदारांना याचा फटका बसणार नसल्याचे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँका आणि सोसायट्यांकडून नोटा मोजण्याचे दर आकारता येतात. मग खातेदारांना हा भुर्दंड कशासाठी असा सवाल विचारला जातो आहे.
[jwplayer mediaid="25977"]