www.24taas.com, मुंबई
इन्शुरन्स कंपन्यांकड़ून बोगस हेल्थ क्लेम घेणा-यांना आता जेलची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. इन्शुरन्स कंपन्यांकडून बोगस क्लेम मंजूर करून घेणा-यांची संख्या वाढत चालल्यानं त्यांच्याविरोधात आता एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. मात्र याचा इतर पॉलिसी होल्डर्सवर परिणाम तर होणार नाही ना ? अशी चिंता व्यक्त केली जातेय.
इन्शुरन्स कंपन्यांकडून बोगस क्लेम वसूल करणा-यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. कंपनीला बोगस क्लेम आढळल्यावर आधी ती पॉलिसी रद्द करून पॉलिसीधारकाकडून स्पष्टीकरण मागितलं जाणार आहे. मात्र यानं समाधान झालं नाही तर एफआयआर दाखल केला जाणार आहे. मागील वर्षी प्रमिअमच्या माध्यमातून 54 कोटी रुपये जमा झाले होते, तर 58 कोटी रुपयांचे क्लेम दाखल करण्यात आले होते. त्यामुळं बोगस हेल्थ क्लेमची संख्या वाढल्याचं इन्शुरन्स कंपन्यांचं म्हणणं आहे.
इन्शुरन्स कंपन्यांच्या या कडक कारवाईमुळं सामान्य पॉलिसी होल्डर दुरावतील अशी भीतीही व्यक्त होतेय. मात्र पॉलिसीचा फॉर्म भरताना सर्व खरी माहिती कंपनीला दिल्यास, तसंच मेडिकल हिस्ट्री नमूद केलेली असल्यास पॉलिसी होल्डरला क्लेम करण्यासाठी अडचण येणार नसल्याचं या क्षेत्रातले जाणकार सांगतात. इन्शुरन्स कंपन्यांनी बोगस क्लेमच्या संख्येवर नियंत्रण आणलं तर याचा फायदा सामान्य पॉलिसीधारकांना होणार आहे. क्लेमची संख्या कमी झाली तर प्रीमीअमची रक्कमही कमी होऊ शकते.