भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच - अण्णा

लोकपाल कायद्याचे तुकडे करत असल्याने सशक्त जनलोकपाल आणण्यासाठी आंदोलन सुरूच राहील, असं अण्णा हजारेंनी आज पहिल्यांदाच संवाद साधताना सांगितलं.

Updated: Nov 4, 2011, 10:25 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

लोकपाल कायद्याचे तुकडे करत असल्याने सशक्त जनलोकपाल आणण्यासाठी आंदोलन सुरूच राहील, असं अण्णा हजारेंनी आज पहिल्यांदाच संवाद साधताना सांगितलं.

 

 

तब्बल एकोणीस दिवसांच्या मोन व्रतानंतर अण्णा हजारेंनी आज संवाद साधला. जनलोकपालाबाबत लढा सुरूच ठेणार असल्याचा निर्धार अण्णांनी व्यक्त केला. हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल मंजूर केले नाही तर पाच राज्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात प्रचार करणार असल्याचा इशारा अण्णांनी दिलाय.

 

हिसारच्या निवडणुकीतून काँग्रेसनं धडा घ्यावा असा सल्लाही अण्णांनी दिला. भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक नसून एकानं डिग्री तर दुस-यानं पीएचडी मिळवल्याची टीकाही अण्णांनी केली.

 

दिल्लीत पोहचल्यानंतर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राजघाटावर गेले. संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जनलोकपाल विधेयकाबाबत चर्चा होणार आहे. अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनीही अण्णांना बैठकीला जाण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार अण्णा दिल्लीत गेले.महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी येथे अण्णांनी मौनव्रत सुरू केले होते.

अण्णांनी राजघाटावर 'वंदे मातरम्' चा नारा देत १९ दिवसांनी आपले मौन सोडले. मौनव्रतामुळे अण्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मन:शांतीसाठी मौनव्रत सुरू केले होते. यामुळे मला नवी शक्ती मिळाली आहे, असे अण्णांनी मीडियाशी बोलताना सांगितले.