www.24taas.com, नवी दिल्ली
मान्सूनच्या उशीरा आगमनामुळं देशातली परिस्थिती फारशी चिंताजनक नसल्याचा निर्वाळा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय. येत्या आठवड्यात मान्सून सक्रीय होईल आणि शेतीची चिंता मिटेल असा आश्वासक आशावाद शरद पवार य़ांनी व्यक्त केला.
जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी पाऊस झालाय. याचा प्रामुख्यानं भात पिकाला फटका बसलाय. देशातल्या महाराष्ट्र , कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या शेतीला मान्सूनचा फटका बसलाय. तरीही येत्या काळात चांगला पाऊस होईल आणि शेती आणि शेतक-यांना दिलासा मिळेल असं पवारांनी सांगितलयं.
वीज निर्मितीवर परिणाम
कमजोर मान्सूनमुळे देशातल्या धरणांमधला पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. परिणामी याचा वीज निर्मितीवर परिणाम होऊ लागला आहे. तर दुसरीकडे उष्णता कमी होत नसल्यानं वीजेची वाढती मागणी कायम आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत तांदळाचं उत्पादन २६ टक्क्यांनी घटण्याची शक्यात आहे. तर डाळींचं उत्पादनही ५३ टक्क्यांनी घटण्याची भीती आहे. तेलबियांचं उत्पादनही १७ टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्यानं आगामी काळात खाद्य तेलांच्या किंमती वाढून महागाईत पुन्हा भर पडण्याची चिन्हं आहेत.