'युपीए'वर नाराज, तरी पाठिंबा तसाच

पेट्रोल भाववाढीच्या तापलेल्या तव्यावर अनेक पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी तयार झालेत. त्यातच युपीएकडं तुटपूंजे संख्याबळ आहे. त्यामुळं युपीएच्या घटक पक्षांची वाढती नाराजी पाहता पुढील काळ सरकारची सत्वपरीक्षा घेणारा असू शकतो.

Updated: May 24, 2012, 08:58 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

पेट्रोलच्या किंमती वाढल्यानं ममता बॅनर्जी सरकारवर नाराज झाल्या आहेत. मात्र त्यांनी सरकारचा पाठिंबा काढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तर युपीएच्या धुरीण नेत्यांनी ममतांना पर्याय म्हणून मुलायमसिंहांची चाचपणी सुरु केलीय. असं असलं तरी  घटकपक्षांमधली नाराजी वाढल्यानं युपीएचे धाबे दणाणले आहेत.

 

पेट्रोलच्या किंमती सरकार वाढवणार याचा अंदाज तृणमूल नेत्या ममता बॅनर्जींना आला होता. त्यामुळंच त्यांनी युपीए-टूच्या तिसऱ्या वर्षपूर्ती सोहळ्याला दांडी मारली. दोन रुपये रेल्वे भाडं वाढलं म्हणून आकांडतांडव करणा-या ममता साडेसात रुपयांच्या पेट्रोल दरवाढीनं सरकारवर खूपच नाराज झाल्यात. सरकारच्या या निर्णयाला आपला कडाडून विरोध असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र अस्थिर राजकीय स्थितीमुळं सरकारचा पाठिंबा काढणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलयं.

 

ममतांच्या विरोधाची पूर्वकल्पना असल्यामुळेच युपीएच्या प्रीतीभोजनात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायसिंहांची मोठी बडदास्त ठेवण्यात आली. ममतांनी पाठिंबा काढलाच तर मुलायमसिंहांना हाताशी धरता येईल असे आडाखे युपीएच्या नेत्यांनी बांधले आहेत. असं असलं तरी पेट्रोल दरवाढीवरुन समाजवादी पार्टी नाराजच आहे. पेट्रोल भाववाढीच्या तापलेल्या तव्यावर अनेक पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी तयार झालेत. त्यातच युपीएकडं तुटपूंजे संख्याबळ आहे. त्यामुळं युपीएच्या घटक पक्षांची वाढती नाराजी पाहता पुढील काळ सरकारची सत्वपरीक्षा घेणारा असू शकतो.