www.24taas.com,नवी दिल्ली
रेल्वे तिकीटांचं आरक्षण आता १२० दिवस आधी होऊ शकणार आहे. अॅडव्हान्स रिझर्वेशनची असलेली मर्यादा ९० दिवसांवरुन १२० दिवस करण्यात आली आहे. १० मार्च २०१२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या फिरस्तीचा प्लॉन चार महिने आधीच करू शकणार आहात.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे आरक्षण खिडक्यांवर सातत्याने होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होईल अशी शक्यता रेल्वे मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या अधिका-यानं व्यक्त केली आहे. प्रवासी आता उन्हाळ्याच्या सुट्टींसाठी तसंच इतर सणांसाठी चार महिने आधीच आपलं तिकीट बुक करु शकणार आहेत.
रेल्वे रिझर्वेशनचं प्रमाण प्रचंड वाढतंय. या वाढत्या मागणीशी सांगड घालण्यासाठी आणि प्रवाशांना त्यांच्या दौ-याचं प्लॅनिंग करायला थोडा जास्त वेळ मिळावा, यादृष्टीनं आरक्षणाची मुदत ३० दिवसांनी वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेच्या लाखो प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे.
दरम्यान, ताज एक्स्प्रेस आणि गोमती एक्स्प्रेस या कमी अंतराच्या गाड्यांचं रिझर्वेशन आत्तासारखं, १५ दिवस आधीच मिळू शकेल, असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. परदेशी पर्यटक सध्या ३६० दिवस आधी रेल्वेचं तिकीट बुक करू शकतात. हा कालावधीही बदलण्यात आलेला नाही.