www.24taas.com,नवी दिल्ली
निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटीसनंतरही वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील कारवाईसंबंधी स्वतः पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगच निर्णय घेण्याची शक्यता आहे. खुर्शीद प्रकरणाची दखल घेऊन पंतप्रधान सोमवारी एक बैठक घेण्याचीही शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे केलेल्या तक्रारीनंतर सलमान खुर्शीद यांनी रविवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. तसेच त्यांनी निवडणूक आयोग आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नाही. मी केलेली घोषणा ही केवळ आमच्याच जाहीरनाम्याचा एक भाग आहे, असंही स्पष्टीकरण केलं आहे.
खुर्शीद यांनी स्वतःचं कितीही समर्थन केलं तरी काँग्रेसचे नेते मात्र खुर्शीद यांच्यावर नाराज आहेत. भारतीय राज्यघटना आणि राजनैतिक स्तंभांचा काँग्रेसच्या नेत्यांनी आदर राखावा. त्यानुसार चौकटीत राहूनच वर्तन करावं असं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी म्हटलं. निवडणूक आयोग आणि सलमान खुर्शीद यांच्या वादात काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारचं अधिकृत वक्तव्य केलं गेलं आहे.
खुर्शीद यांच्या वक्तव्यावर विरोधकही या मुद्द्यावर आक्रमक झालेत.सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.