www.24taas.com,नवी दिल्ली
सर्वसामान्यांचं जगण आजपासून आणखी महागणार आहे. सरकारनं सेवाकरात आणखी वाढ केलीये. आता सेवाकर १० टक्क्यांऐवजी १२ पूर्णांक ३६ टक्के असणार आहे. आजपासून ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
टोल, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक, सांस्कृतिक कला, क्रीडासंबंधित प्रोत्साहनपर कार्यक्रम अशा काही निवडक सेवा वगळता सर्वत्र हा सेवाकर लागू असणार आहे. रेल्वेला मात्र हा वाढीव सेवाकर लागू असणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तर विमानप्रवास, जीवन बीमा, ब्युटी पार्लर, ड्राई क्लिनिंग, हेल्थ क्लब, केबल ऑपरेटर, क्रेडिट कार्ड, क्रेडिट रेटिंग आदींवर कर लागू असणार आहे.
अंत्यसंस्काराशी जोडलेल्या सेवा सेवाकराच्या अखत्यारित नसतील. तर, ज्या सेवांना कराच्या अखत्यारित आणण्यात आले आहे, त्यात शिक्षण आणि प्रशिक्षणाचा समावेश आहे. त्याचवेळी शालेय, विद्यापीठ पातळीवरील आणि व्यावसायिक शिक्षणाला त्यातून वगळण्यात आले आहे. रेल्वेसेवा कराविषयी मात्र अद्याप संदिग्धता आहे. रेल्वेमंत्री मुकुल राय यांनी अर्थ मंत्रालयाचे प्रभारी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना पत्र लिहून रेल्वे सेवांवर कोणताही कर न लावण्याची विनंती केली आहे.
अर्थमंत्रालयाने २०१२-२०१३ या अर्थसंकल्पात अधिकांश सेवांना सेवाकराच्या यादीत आणण्याची योजना केली आहे. अशा सेवांची संख्या ११९ आहे. तर सेवाकरापासून दूर ठेवण्यात आलेल्या सेवांची यादीदेखील तयार करण्यात आली आहे.