अजिंठा-वेरूळ झाला 'हॉटस्पॉट'

दिवाळीची सुट्टी आणि त्यापाठोपाठ लागून आलेली शनिवार रविवारची सुट्टी, त्यामुळे सगळ्याच हौशी पर्यटकांनी आपल्या आवडीची ठिकाणे गाठली आहेत, त्यातच अजिंठा वेरूळच्या लेणी हा पर्यटकांचा 'हॉटस्पॉट' त्यामुळे अनेकांनी या ठिकाणाला पसंती दिली आहे.

Updated: Nov 1, 2011, 01:21 PM IST

[caption id="attachment_4574" align="alignleft" width="300" caption="अजिंठा लेणी"][/caption]

झी 24 तास वेब टीम, अजिंठा

 

दिवाळीची सुट्टी आणि त्यापाठोपाठ लागून आलेली शनिवार रविवारची सुट्टी, त्यामुळे सगळ्याच हौशी पर्यटकांनी आपल्या आवडीची ठिकाणे गाठली आहेत, त्यातच अजिंठा वेरूळच्या लेणी हा पर्यटकांचा 'हॉटस्पॉट' त्यामुळे अनेकांनी या ठिकाणाला पसंती दिली आहे. 

 

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली असून येथे उपलब्ध असलेल्या प्रदूषणमुक्त बस पर्यटकांना सेवा पुरवण्यास अपुर्‍या पडत आहेत. रविवारी २५ हजारावर पर्यटकांनी लेणीला भेट दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अजिंठा लेणी येथे सुरू असलेल्या प्रदूषणमुक्त बसची संख्या १४ असून रविवार दुपारपर्यंत फक्त आठच बस सुरू होत्या. त्यामुळे पर्यटकांना तासन्तास बसची वाट पाहत बसावे लागले. तसेच पर्यटकांना अजिंठा व वेरूळचा दौरा न करता एकाच लेणीत समाधान मानावे लागले. सिल्लोड आगाराने येथे आणखी बसची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

 

वाहनतळही अपुरे

येथील वाहनतळही अपुरे पडत असून वाहनधारकांना रस्त्यावरच गाड्या लावाव्या लागत आहेत. अजिंठा हे जागतिक पर्यटनस्थळ आहे. पावसाळा व हिवाळ्याच्या दिवसांमध्ये येथे येणार्‍यांची संख्या दिवसेंविस वाढत असते. मात्र, त्या तुलनेत सुविधांची पूर्तता होत नसल्याने लांबून आलेल्या पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 

प्रदूषणमुक्त बसचा दुरुपयोग

वास्तविक या प्रदूषणमुक्त बस फक्त अजिंठा लेणीसाठी आहेत. परंतु एस.टी. महामंडळ कमाईच्या दृष्टीकोनातून या बसेस औरंगाबाद ते जळगाव मार्गावर चालवत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही उपयोग होत नसल्याने अजिंठा लेणीत येणार्‍या पर्यटकांची दिवसेंदिवस गैरसोय वाढतच आहे.