विशाल करोळे , www.24taas.com, औरंगाबाद
पैठणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाला सध्या महसूल विभागानं टाळं ठोकलं आहे. उद्यानाच्या कंत्राटदारानं महसूल विभागाचा जवळपास सव्वा कोटींचा मनोरंजन कर थकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर हे उद्यान बंद असून उद्यानातील वृक्ष संपती आता धोक्यात आलीय.
पैठणचं संत ज्ञानेश्वर उद्यान तसं चांगलं, पण सध्या वेशीवर टागलं अशी काहीशी परिस्थिती या उद्यानाची झालीय. दीडशे एकरच्या उद्यानावरील ९० एकराचा भाग पूर्णपणे सुशोभित करण्यात आलाय. पैठणला तसंच जायकवाडी धरणाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे हे उद्यान पैठणच्या पर्यटनातील महत्वाचं केंद्र बनलंय. सिंचन विभागाच्या मालकीचं हे उद्यान व्यापारी तत्वावर १० वर्षांकरता पुण्याच्या एका कंत्राटदाराला देण्यात आलं होतं. मात्र या कंत्राटदारानं गेल्या दहा वर्षांपासून करच भरलेला नाही. त्यामुळे उद्यानाला महसूल विभागानं टाळं ठोकलंय. या उद्यानात विविध प्रकारची १० हजारांपेक्षा जास्त झाडं आहेत. उद्यानाला टाळं लागल्यानं इथली वृक्षसंपदा धोक्यात आलीय. याबाबत तहसीलदारांना विचारलं असता कायद्याचा बागुलबुवा दाखवून त्यांनीही हात वर केलेत.
दहा वर्षांसाठी ४ कोटी रूपये असा करार झाल्यानंतर कंत्राटदारावर देखरेख ठेवण्याचं काम सिंचन विभागाचं होतं. मात्र सिंचन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केलं. सध्या उद्यानाची वाताहत सुरू आहे. तर दुसरीकडे या सगळ्यासाठी कंत्राटदारच दोषी असल्याचा आरोप सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय.
कंत्राटदाराची तर वेगळीच बोंब आहे. मनोरंजन कराबाबत सिंचनविभागानं सांगितलच नसल्याचं कंत्राटदाराचं म्हणणं आहे. उद्यान तोट्यात चालत असल्यानं सिंचन विभागानं कर कमी करण्यासाठी सरकारला पत्रही लिहलं होतं मात्र महसूल विभाग वसूलीवर ठाम आहे. उद्यान बंद असल्यानं आसपासच्या लोकांवरही त्याचा परिणाम जाणवतोय. पर्यटकांवर अवलंबून असलेले लोक आता उद्यान कधी उघडणार याची वाट पाहत आहेत.
कंत्राटदार, सिंचन विभाग आणि महसूल विभागाच्या खेळखंडोब्यानं उद्यानाचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. आता या उद्यानातील वृक्षसंपदा वाचवणं सर्वस्वी सरकारच्या हाती आहे. अन्यथा पैठणच्या गौरवशाली इतिहासाप्रमाणे हे उद्यान आणि इथली निसर्गसंपदा इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.