औरंगाबाद फाईल्स गहाळ प्रकरणी कारवाई नाहीच

औरंगाबाद महापालिकेतील फाईल्स गहाळ प्रकरणी दोन महिन्यानंतरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. महापौरांनी या प्रकरणी बोलावलेल्या बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. महापालिकेला कोट्यवधीचा चूना लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कशी आणि केव्हा होणार असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

Updated: Nov 24, 2011, 05:17 PM IST

झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद

 

औरंगाबाद महापालिकेतील फाईल्स गहाळ प्रकरणी दोन महिन्यानंतरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. महापौरांनी या प्रकरणी बोलावलेल्या बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. महापालिकेला कोट्यवधीचा चूना लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कशी आणि केव्हा होणार असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. औरंगाबाद महापालिकेतून दहा हजार फाईल्स गायब झाल्याचं प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून गाजत आहे.

 

झी २४ तासने प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर महापालिका आयुक्तांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राणाभीमदेवी थाटात घोषणा केली होती. आत्ता मात्र आयुक्त यावर काहीही बोलायला तयार नाहीत. याचा जाब विचारण्यासाठी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी बैठक बोलावली. या बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही.

 

महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. राजकारणी, बिल्डर आणि मनपा अधिकाऱ्यांनी मिळून या फाईल्स गायब केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यामुळंच फाईल्स गहाळ प्रकरणीची चौकशी थंड पडल्याच सांगण्यात येतं.