www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये एटीएसनं अहमदाबाद बॉम्बस्फोटातील वॉन्टेड अतिरेक्याचा खात्मा केला आहे. तर दोघांना जिवंत पकडून मोठं यश मिळवलं आहे. हे अतिरेकी औरंगाबादमध्ये कशासाठी आणि कुणाकडे आश्रयाला होते हे प्रश्न मात्र निर्माण झाले आहेत.
औरंगाबादच्या रोजाबागमध्ये झालेल्या एन्काउंटरमुळं पुन्हा दहशतवाद्यांचे औरंगाबाद कनेक्शन उघड झाले आहे. महाराष्ट्र एटीएसनं केलेल्या कारवाईत संशयित अतिरेकी खलिल खिलजी मारला गेला. तर त्याच्या दोन साथीदारांना जिवंत पकडण्यात यश आलं आहे. संशयित अहमदाबाद स्फोटांमधील वॉन्टेड असल्याचं सांगण्यात येत आहे. मध्यप्रदेशातल्या खंडव्यातले आरोपी औरंगाबादला कशासाठी आले होते. त्यांना काही घातपात घडवायचा होता का?
ते औरंगाबादमध्ये कुणाला भेटाय़ला आले होते. कुणी त्यांना आश्रय दिला होता असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस माध्यमांशी फारसं काही बोलत नसले तरी त्यांच्या देहबोलीवरुन मोठं यश मिळवल्य़ाचं दिसत आहे. टीम अधिक तपासासाठी मध्यप्रदेशात जाणार आहे. तर खांडवा पोलिसांचं एक पथक औरंगाबादसाठी रवाना झालं आहे.
दहशतवादी हल्ला करण्यासाठी अतिरेकी औरंगाबादमध्ये आले होते, की औरंगाबाद त्यांचं आश्रयस्थान होतं याचा पोलीस आणि एटीएस तपास करत आहेत. मात्र दहशतवाद्यांच्या एका गटाचा खात्मा करुन एटीएसनं संभाव्य दहशतवादी हल्ला रोखला आहे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.