www.24taas.com, बीड
केवळ राज्यातच नव्हे तर देशात स्त्री भ्रुणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान या विषयावर खळबळ माजली असताना आणि आघाडीचा अभिनेता आमीर खानदेखील यावर जनजागरण करत असताना ज्या जिल्ह्यात हे प्रकार सर्रास होत आहेत त्या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी मात्र अत्यंत बेजबाबदार वक्तव्यं केली आहे.
“आम्ही काय प्रत्येक गरोदर बाई मागे आमचे लोक ठेवायचे का?सध्या बीड जिल्ह्यात केज विधानसभेची निवडणूक आहे त्याच बरोबर टंचाई आहे,त्या मुले माझी सर्व यंत्रणा अडकली आहे,अशा वेळी आम्ही काय फक्त भ्रुणहत्या होते कि नाही हेच बघायचे का?”असा चीड आणणारा सवाल करून जिल्हाधिकारी यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत.
‘असे अधिकारी असतील तर डॉ. मुंडेसारखे लोक नक्कीच सुटू शकतील, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गर्भवती महिले सोबत कर्मचारी ठेवावा असे नाही तर त्यांनी कागदोपत्री कमिटीची कामे न करता कडक कारवाई करावी’ अशी प्रतिक्रिया आ.शोभा फडणवीस यांनी दिली.
‘जर अधिकारीच अशी उत्तरे देत असतील तर काय बोलायचे? डॉ.मुंडे सारख्यांना यामुळेच पाठबळ मिळते’ असा आरोप काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस सुधा हजारे यांनी केला. देशात गाजणाऱ्या या विषयावर कोचे सारखे अधिकारी जर अशा पद्धतीने बोलणार असतील तर डॉ. मुंडे सारखे लोक का बिनधास्त फिरणार नाहीत हा खरा प्रश्न आहे.