www.24taas.com, मुंबई
ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून परत एकदा स्पष्टपणे हे दिसून आलं आहे की दोन्ही ठाकरे बंधु एक आहेत. ठाकरे बंधु लोकांची दिशाभूल करत आहेत आणि हे परत एकदा सिद्ध झालं आहे. बदलापूर, कल्याण आणि परत ठाण महापालिका निवडणुकीत हेच वारंवार दिसून आलं आहे की हे दोघे एक आहेत. मला वाटतं नाशिकमध्येही याचीच परत पुनरावृत्ती होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली आहे.
ठाणे महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर मधुकर पिचड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे ठाण्यात सेनेचा महापौर होण्याचा मार्ग सूकर झाला. गेले तीन दिवस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात महापालिकेत सत्ता काबिज करण्यावरुन घमासान सुरु होतं. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्यानंतर तर सेनेने ठाणे बंदची हाक दिली त्याला हिंसक वळण लागलं. भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी उच्च न्यायालयात धाव घेत हेबियस कॉर्पस रिटही दाखल केला होता. सेना-भाजपने महामोर्चा काढण्याचा प्रयत्न केला त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली.
राष्ट्रवादी काँग्रसेच्या जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका सत्ता काबिज करणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवल्याने सेना-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष निकाराला गेला होता. त्यातच काँग्रेसच्या दोन नगरसेविकाही गायब झाल्या. आज अखेर सुहासिनी लोखंडेंनी सभागृहात मतदानाला हजेरी लावत युतीच्या बाजुनेच मतदान केलं. तर काँग्रेसच्या अनिता केणी आणि शकिला कुरेशी या शेवटपर्यंत गैरहजर राहिल्या. मनसेच्या सात सदस्यांनी सेनेला मतदान केल्याने सेनेचे हरिश्चंद्र पाटील ७३ मत मिळवत विजयी झाले.