पाण्याची तहान ठरली जीवघेणी

वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

Updated: Apr 23, 2012, 06:13 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

कोट्यवधी रुपयांच्या योजना आदिवासी विभागामार्फत राबवूनही आदिवासी पाण्यासाठी तहानलेले आहेत.  दऱ्याखोऱ्यात मैलोमैल पायपीट करून आपल्या कुटुंबाची तहान भागवावी लागतेय. अशीच वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे.  विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

 

ठाण्याच्या मोखाडा तालुक्यातलं आदिवासी पाड्यांचं हे डोलारा गाव. याच गावात पाण्यासाठी वणवण करताना पार्वती जाधवांचा मृत्यू झाला. पदरात पाच पोरं. त्यांची तहान भागवण्यासाठी ही माऊली रोज मैलोन् मैल पायपीट करायची. उन्हाळाच काय बाराही महिने इथे पाण्याची बोंब.. पाड्यापासून सात ते आठ किलोमीटरवर एकच विहीर. शासकीय टँकर याच विहीरीत पाणी ओतून जाणार. मग सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कमरेवर आणि डोक्यावर हंडे घेऊन फक्त वणवण. हाच या महिलांचा दिनक्रम. अशाच शुक्रवारच्या दुपारी पाणी भरता भरता पार्वतीला धाप लागली आणि ज्या पाण्यासाठी आयुष्यभर पायपीट केली, त्या पाण्याचा एक घोटही न घेता, तिनं प्राण सोडला.

 

पाच वर्षांच्या चिमुरडीपासून ते सत्तरीच्या वृद्धेपर्यंत मोखाड्यातली ही पाण्यासाठीची वणवण  आजपर्यंत कुणालाही चुकली नाही.  सरकारी पाणीपुरवठ्याची व्यवस्था किती कोरडी आहे, हे आतापर्यंत अनेक उदाहरणांनी सिद्ध केलंय. पाण्यासाठी युद्धं होतील, हे भाकित खरं ठरतंय, त्याच युद्धानं एक बळीही घेतलाय.