झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी
कोलकत्त्यात हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत अनेकांचा बळी घेतला मात्र राज्यातील हॉस्पिटल्सनी अजूनही या पासून धडा शिकला नाही आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय हॉस्पिटल, आणि कलेक्टर ऑफिसमध्ये आग लागल्यास विझवण्याची यंत्रणाच धूळ खात पडली आहे.
कोलकत्यातील रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर महाराष्ट्र सरकारला जाग आली, आणि प्रत्येक शासकीय कार्यालयात अग्नीशमन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचा फतवा काढण्यात आला. मात्र अजूनही राज्यात बहुतांश हॉस्पिटल्सनी ही समस्या गंभीरतेने घेतली नसल्याचंच चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याल बहुतांश शासकीय हॉस्पिटल आणि कार्यालयातील सिलेंडर्स निधी नाही म्हणून बंद आहेत. शेकडो रुग्णांचा दररोज राबता असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येही अशा प्रकारची यंत्रणा तोकडीच असल्याने अशी दुर्घटना घडलीच तर जबाबदार कोण असा सवाल रुग्णांचे नातेवाईक करतात.
रत्नागिरीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही हीच अवस्था आहे. कार्यालयातील २० पैकी १५ सिलेंडर्स नादुरुस्त आहेत. तरीही या बंद सिलेंडर्सकडेही कोणाचे लक्ष नाही. 'झी २४ तास'च्या टीमनं विचारणा केल्यावर आता याबाबत प्रस्ताव पाठवत असल्याचे शासकीय उत्तर देण्यात आल आहे. खरोखरच आग लागली तर काय? आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्यांनी तरी आपण स्वत: सुरक्षित आहोत का ? याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.