भोंदूबाबाचा पर्दाफाश

आपल्याला दृष्टांत झाला आणि त्यामुळे दैवी शक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करत अचानकपणे हा दिलीप गजभिये बेडीवाला बाबा बनला. त्यानं आपल्या राहत्या घरी छोटेखानी मंदिर बनवलं. आपलं व्यवस्थीत आसनही तयार केलं.

Updated: Dec 8, 2011, 06:24 AM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 

दिलीप गजभिये उर्फ विक्तेश्वर उर्फ बेडीवाले बाबा. हाता पायात बेड्या वाढलेले केस असं त्याचं राहणीमान.  त्यानं नागपूरातील धाडीलाल ले-आऊट परिसरात आपलं बस्तान मांडलं होतं. त्यानं आपल्या राहत्या घरातच भोंदुगिरीचं दुकान थाटलं होतं. बेडीवाले बाबा म्हणून त्याची सर्वदूर ख्याती होती. आपल्याला दृष्टांत झाला आणि त्यामुळे दैवी शक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करत अचानकपणे हा दिलीप गजभिये बेडीवाला बाबा बनला. त्यानं आपल्या राहत्या घरी छोटेखानी मंदिर बनवलं. आपलं व्यवस्थीत आसनही तयार केलं. हे सर्व चित्र पाहून सर्वसामान्यांचा या भोंदूवर सहज विश्वास बसायचा.मात्र अखेर त्याच्या या भोंदूगिरीचा पर्दाफाश झालाच. नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत या भोंदूबाबाचा पर्दाफाश केलाय.

 

या बेडीवाले बाबाची उपचार करण्याची पध्दतही मोठी अनोखी होती. तो रोगावर उपचार करण्यासाठी रोग्यांना बेड्यांनी बांधत असे आणि उपचार करण्याची बतावणी करत असे. नागपूर परिसरात या दिलीपने त्याच्या भोंदूगिरीच्या जोरावर चांगलाच जम बसवला होता. नागपूरातील बहूतांश भागात या दिलीपचा बोलबाला होता. याच भोंदूगिरीच्या जोरावर या दिलीपनं नागपूर भागात भव्यदिव्य आश्रम ही थाटला होता. कोणत्याही असाध्य रोगावर आपल्याकडे रामबाण औषध आहे असा दावाही दिलीप करायचा. करणी असो वा भूतबाधा,पोटदूखी असो वा प्रेमभंग किंवा गृहक्लेश या अशा अनेक जटील समस्यांवर या आपल्याकडे उतारा असल्याचा दावा तो करत असे. भोळ्या भाबड्या लोकांना दिलीप आपल्या जाळ्यात अडकवत असे. गेल्या अनेक दिवसांपासून दिलीपचा हा काळा धंद्दा राजरोसपणे सूरु होता. अगदी कमी दिवसातच या भोंदू बाबा दिलीपची प्रसिध्दी वाऱ्यासारखी नागपूर परिसरात पसरली होती. त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असे. दिवसेंदिवस या दिलीपची प्रचिती वाढत होती आणि त्याच्या भक्तांची संख्याही. त्याच बरोबर या भोंदूबाबाची काळी मायाही.

 

मात्र, हा बाबा निव्वळ लोकांची फसवणूक करत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं होतं. स्थानिकांनी अनेकवेळा त्याची भेट घेतली. त्याला समजावूनही सांगितलं.मात्र त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. आपण लोकांची फसवणूक करत नसून आपण समाजसेवा करत असल्याची तो बतावणी करत असे.एवढंच नाही तर त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तो आत्महत्या करणार असल्याची धमकी देत असे. आपल्या परिसरात बेडीवाले बाबाच्या या उपद्रवामुळे स्थानिक पुरते वैतागले होते. त्यांनी या बाबाला अद्द्ल घडविण्याचं ठरवलं आणि ठरल्यानुसार त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या बाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

 

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता बेडीवाले बाबा उर्फ दिलीप गजभिये याच्या घरी पोलीस पथक दाखल झालं. आपल्या घरी पोलिसांना पाहून दिलीपच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पुरता भेदरला.पोलिसांनी काही स्थानिकांच्या मदतीने या भोंदूबाबाच्या बनवेगिरीचा पर्दाफाश केला..पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी दिलीप उर्फ बेडीवाले बाबाला अटक केली. पोलिसांनी आरोपी दिलीपला उचलून घेउन आपल्या गाडीत बसवलं. या भोंदूबाबाचा पर्दाफाश झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.