www.24taas.com, चंद्रपूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज नागपूरला पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत.
तर राज ठाकरेंच्या दौऱ्यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आज ताडोबात राज आणि पतंगराव आमनेसामने असणार आहेत. दरम्यान राज यांच्यासह दौऱ्यावर असलेल्या मनसे आमदार बाळा नांदगांवकर यांनी पतंगराव कदम यांच्यावर तोफ डागली आहे.
मौजमजा आणि बदल्यांशिवाय वनमंत्र्यांना कोणत्याही गोष्टीत रस नसल्यानं जंगलाची दूरवस्था झाल्याचा आरोप नांदगावकरांनी केला आहे. त्यामुळे आता पतंगराव राज ठाकरे यांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.