रुग्णालयाचा कारभार ढिसाळ, चोरीला गेलं तान्हं बाळ

नागपूरच्या सरकारी रुग्णालयातून चार दिवसांचं बाळ चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका अनोळखी महिलेनं विश्वास संपादन करुन हे कृत्य केल्याचं समोर येतंय. या प्रकरणानं रुग्णालयातील ढिम्म कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Updated: Apr 14, 2012, 05:06 PM IST

www.24taas.com, नागपूर

नागपूरच्या सरकारी रुग्णालयातून चार दिवसांचं बाळ चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका अनोळखी महिलेनं विश्वास संपादन करुन हे कृत्य केल्याचं समोर येतंय. या प्रकरणानं रुग्णालयातील ढिम्म कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात ९ एप्रिलला शशिकला जीभकाटे ही महिला प्रसुतीसाठी दाखल झाली. प्रसुतीनंतर वॉर्ड क्र. ४६ मध्ये तिला ठेवण्यात आलं. एक्स रे काढण्यासाठी ती आपल्या चार दिवसांच्या बाळासह वॉर्डबाहेर गेली होती. याचवेळी एका अनोळखी महिलेनं शशिकला हिचा विश्वास संपादत करत तिचं बाळ ताब्यात घेतलं.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरु केली आहे. रुग्णालयात गर्भवती महिलेसोबत येणाऱ्या व्यक्तीची चौकशी तर सोडाच, साधी नोंदही ठेवली जात नाही. रुग्णालय प्रशासानानं या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही अद्याप पोलिसांच्या हवाली केलं नाही. यावरुन या प्रकरणी रुग्णालय प्रशासन किती गंभीर आहे, हे लक्षात येतं. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यानं आईची आणि बाळाची ताटातूट झाली आहे. राज्यात सरकारी रुग्णालयातून बाळ चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातून सरकारनं धडा घेत कडक उपाययोजना केल्या नाहीत, हेच उघड होतंय.