www.24taas.com, चंद्रपूर
भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याच चंद्रपूर शहरात महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांनी वेगळी चूल मांडली आहे. चंद्रपूर शहर छोटे असले तरी नाशिकमध्येही भाजपने वेगळी चूल मांडली. त्यामुळे युतीतील राजकारण आता वेगळा संसार थाटण्याच्या स्थितीत दिसून येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याच चंद्रपूर शहरात महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती तुटलीय. चंद्रपूर महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढणार आहेत. शिवसेना 36 तर भाजप 66 जागांवर निवडणूक लढणार आहे. 12 जागांबाबत मतभेद होते, मात्र अखेरपर्यंत हा तिढा सुटला नाही. त्यानंतर शिवसेनेनं युती तोडण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 15 एप्रिलला राज्यातल्या 5 महापालिकांसाठी निवडणूक होतेय. दरम्यान, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दीपक बेले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. शिवसेनेच्या वरीष्ठ नेतृत्वानं पैसे घेऊन पदे वाटल्याचा खळबळजनक आरोप बेले यांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला खिंडार पडलंय. महापालिकेची निवडणूक 15 एप्रिलला होणार आहे.
तुझं माझं युती शिवाय जमेना, याचा प्रत्यय वेळोवेळी शिवसेना आणि भाजप यांना आलेला दिसून आला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत युती तुटण्याची शक्यता असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांची धावाधाव करून युती टिकवली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत काही ठिकाणी सेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले. जो व्हायचा तोच परिणाम झाला. चांगला सपाटून मार खल्ल्यानंतर सत्तेसाठी युतीचे डोहाळे लागले. मात्र, कार्यकर्त्यांच्या नावावर बिल फाडून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचाच प्रत्यय चंद्रपूर, नाशिक याठिकाणी दिसून येत आहे.
स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष सोयीनुसार राजकारण करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना कधी राष्ट्रवादी तर मनसेला जवळ करताना दिसून आली आहे.तर भाजपने नव्याने मनसेशी सूत जूळवून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. हीच शिवसेनचे डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपनेही तसेच उत्तर दिल्याने सेनेला नाशिकमध्ये माघार घ्यावी लागली. त्यामुळे याठिकाणी मनसेने बाजी मारत सत्ता काबीज केली. हीच युतीतील धूसफूस दोन्ही पक्षात वेगळी चूल मांडण्यात होवू शकते, हेच चंद्रपुरातील राजकारणावरून दिसून येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.