एकीकडे रवी राणा यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण मात्र पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. मात्र त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला मात्र अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही. सरकारने २३ तारखेला कापूस दराबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर, आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा महाजन यांनी दिला आहे.
महाजन यांच्या उपोषणाला समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. ४०० कार्यकर्त्यांनी मोटर सायकल रॅली काढून पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामीण भागातील भजनी मंडळींनी भजनांतून कापूस उत्पादकांची व्यथा मांडली. आंदोलनाच्या ठिकाणी भजनी मंडळांनी मांडलेल्या व्यथा ऐकून उपस्थितांची मन हेलावून गेली.
सरकारने तोडग्याचं अश्वासन दिल्यावर रवी राणा यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र गिरीश महाजन यांच्या उपोषणाची साधी दखलही घ्यायला सरकार तयार नाही, अशी संतप्त भावना कापूस उत्पादक व्यक्त करत आहेत.