कापूस आंदोलनाला हिंसक वळण

जळगाव जिल्ह्यात कापूस दरवाढीच्या आंदोलनाने चांगलाच वेग घेतला आहे. जळगाव औरंगाबाद महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केला. तर जामनेर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ४ बसेसची तोडपोड केली.

Updated: Nov 19, 2011, 09:44 AM IST

झी २४ तास वेब टीम, जळगाव

 

जळगाव जिल्ह्यात कापूस दरवाढीच्या आंदोलनाने चांगलाच वेग घेतला आहे. जळगाव औरंगाबाद महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केला. तर जामनेर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ४ बसेसची तोडपोड केली. राज्यात कापूस उत्पादकांच्या आंदोलनाचा भडका उडालेला असताना, सरकार अद्याप कोणताही निर्णय घेऊ शकलेलं नाही. यामुळं शेतकरी संतापले. सरकारचा निषेध करण्यासाठी जळगावात पारोळ्यात हजारोंच्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

 

नागपूर सूरत हायवेवर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कापसाच्या बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करुन रास्ता रोको केला. संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या पांढऱ्या सोन्याला सरकार भाव देत नसल्यामुळं रस्त्यावर कापूस फेकून सरकारचा निषेध केला. कापसाला सरकार सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर करत नाही. तोपर्यंत आंदोलनाचा भडका उडतच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला.

 

दिवसेंदिवस हा तिढा वाढतच चालला आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता हिंसक वळण लागत चालले आहे. या प्रकरणामुळे सरकार मात्र आता चांगलेच अडचणीत आले आहे. तसेच कापूस प्रश्नाप्रकरणी आमदार रवी राणा यांनी केलेले उपोषण हे देखील चांगलेच गाजते आहे, परंतु उपोषणामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. आणि यामुळेच आता उपोषणाने तीव्र रूप धारण केले आहे.