जळगावातील खोट्या प्रतिष्ठेचा बळी ठरलेल्या मनिषा धनगर हत्येप्रकरणी, तिच्या वडील आणि काकांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मनिषाच्या आजीला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सामोपचारानं हा प्रश्न मिटवता आला असता, असं मयत मनिषाचा प्रियकर संदीप पाटीलनं म्हटलं आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या पाथरीमधील १९ वर्षांची मनिषा धनगर आता या जगात नाही. तिच्या वडील आणि काकांनी गळा दाबून तिची निर्दयपणे हत्या केली. या हत्येप्रकरणी, तिच्या वडील आणि काकांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मनिषाच्या आजीला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. खोट्या प्रतिष्ठेपायीच मनिषाची हत्या झाल्यामुळं तिचा प्रियकर संदीप पाटील कमालीचा निराश झाला आहे. सामाजिक सामोपचारानं हा प्रश्न मिटला असता मात्र मनिषाच्या घरच्यांनी तिचा घात केला, अशा भावना संदीपनं झी 24 तासकडं व्यक्त केल्या आहे.
आपल्या लेकीच्या हत्येमुळं मनिषाच्या आईलाही धक्का बसला आहे. याप्रकरणी आपल्याच पती आणि दीराला अटक झाल्यामुळं ती सुन्न झाली आहे. ज्या गावात मनिषाची हत्या झाली, तिथल्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली. खोट्या प्रतिष्ठेपायी रक्ताची नाती संपवण्याचे प्रकार राज्यात वाढू लागले आहेत. त्यामुळे पुरोगामी समजल्या महाराष्ट्रातील घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी पुन्हा एकदा सामजिक क्रांतीची गरज भासू लागली आहे.