मनसेचे नगरसेवक अज्ञातस्थळी

नाशिकमधील मनसेचे सर्व ४० नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. फोडाफोडीच्या राजकाणात मनसेची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे महापौरपदाची चुरस शिगेला पोहचली आहे.

Updated: Feb 23, 2012, 10:43 PM IST

www.24taas.com, नाशिक 

 

 

नाशिकमधील मनसेचे सर्व ४० नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. फोडाफोडीच्या राजकाणात मनसेची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे महापौरपदाची चुरस शिगेला पोहचली आहे.

 

 

नाशिकमध्ये मनसेच्या ४०  नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आलंय. महापौरपदासाठी चुरस निर्माण झाल्यानं फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून मनसेनं सर्वांना अज्ञातस्थळी रवाना केलंय. नाशिकमध्ये सर्वाधिक जागा मिळवत मनसे एक नंबरचा पक्ष ठरलाय. पण नाशिकची सत्ता राखण्यासाठी भुजबळांनीही हालचाली सुरु केल्यायत. आरपीआयला महापौरपदाची ऑफर देत काल भुजबळ आणि आठवलेंची भेट झाली होती. त्याचबरोबर शिवसेना, भाजपची भूमिका अजून स्पष्ट झाली नाही. या पार्श्वभूमीवर फोडाफोडी होऊ नये, यासाठी मनसे पुरती खबरदारी घेतंय.

 

 

नाशिक महापालिकेत सर्वाधिक जागा मनसेनं जिंकल्या आहेत. सत्तेसाठी कोणताही धोका स्वीकारायचा नाही, असा चंग मनसेने बांधला आहे.  मनसेचे चाळीस नगरसेवक  अज्ञातस्थळी ‘सहली’साठी रवाना झाल्याचं वृत्त आहे. नाशिकमधील सत्तास्थापनेच्या हालचालींनी घेतलेली गती पाहता संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठीच मनसेनं हे पाऊल उचलंल आहे. सहलीला जाण्यापूर्वी मनसेच्या नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली.

 

 

महापौर निवडीसाठी काही दिवस शिल्लक आहेत. त्या दिवसांमध्ये सर्व नगरसेवकांनी एकत्र रहावं, त्यांच्यात सहकार्याची भावना वाढावी, एवढाच या सहलीमागचा उद्देश आहे, असं मनसेचे आमदार वसंत गीते यांनी स्पष्ट केलं असलं तरी संभाव्य धोका होवू नये यासाठीच ही खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे.