कष्ट अन् विज्ञानानं घडवला चमत्कार...

गरज ही शोधाची जननी असते त्यामुळेच बदल होतो आणि मग विकास... शेतीक्षेत्रात ही अशीच घोडदौड सुरु आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची गती वाढतेय. सांगली जिल्ह्यातही असाच एक बदल शेतकऱ्यांनी घडवून आणलाय.

Updated: Jul 10, 2012, 10:13 AM IST

www.24taas.com, सांगली  

 

गरज ही शोधाची जननी असते त्यामुळेच बदल होतो आणि मग विकास... शेतीक्षेत्रात ही अशीच घोडदौड सुरु आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची गती वाढतेय. सांगली जिल्ह्यातही असाच एक बदल शेतकऱ्यांनी घडवून आणलाय.

 

शेतकरी म्हटलं की निसर्गाची आपत्ती आणि सरकारी व्यवस्थेचा दणका हा त्याला बसतोच. त्यामुळे त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी सात वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील रेठरेहरणाक्ष गावातील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी सर्वांत आधी राजाराम कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. शेतकऱ्यांचं समाधान हे उत्पादनवाढीशी निगडीत असल्याने विज्ञान मंडळाने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले. तसेच त्यांचा उत्पादन खर्च ही कमीच असायला हवा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण यश येईना मग, त्यांनी थेट कृषी विक्री केंद्र सुरु केलं आणि खरेदी करतांना होणारी लूट थांबवली.

 

११ सदस्यांच्या या विज्ञान मंडळात कृषी पदवीधरांची संख्या जास्त असल्याने खते, बियाणे, कीडनाशके यांच्या वापराबाबत माहिती देण्यास ते थेट शेतकऱ्यांच्या शेतावरच भेटू लागले. परिणामी शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला आणि त्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ दिसून आली आणि तीही कमी खर्चात. सुरुवातीला विज्ञान मंडळ उभारतांना भांडवालाची गरज होती त्यासाठी एका पतसंस्थेमध्ये कृषी विज्ञान मंडळाने कर्जाचे कॅशक्रेडिट केले. रोजच्या रोज रक्कमेचा भरणा या खात्यावर केला जातो, तर संपूर्ण संचालक मंडळ यासाठी जामीन आहे. सद्य १० लाखाहून अधिक रक्कमेची खते आणि  कीडनाशके मंडळाकडे उपलब्ध आहेत. गोडावून भाडं, कर्जाचं व्याज आणि एका नोकराचा पगार त्यातून दिला जातो. ना नफा ना तोटा या तत्ववर हे मंडळ सध्या शेतकऱ्यांच्या विश्वासावर चालवलं जातंय.

 

रेठरेहरणाक्ष गावातील २०० हून अधिक शेतकरी या मंडळाशी सलंग्न आहेत. २४ तास सेवा या मंडळा तर्फे राबवली जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा झाला आहे तर गावाबाहेरच्या शेतकऱ्यांना मोबईलद्वारे मार्गदर्शन केलं जातं. शेती व्यवसाय थेट निसर्गाशी निगडीत असतो त्यामुळे कृपा आणि अवकृपेचं मोलं सर्वात आधी शेतकऱ्यालाच चुकवावं लागतं. वर्षानुवर्षं त्याची दशा आजही बघवत नाही मात्र, हे चित्र बदलायचं असेल तर राजाराम कृषी विज्ञान मंडळासारखा उपक्रम हाती घेउन शेतकऱ्यांनी गटा गटाने एकत्र येत उत्पादन खर्च कमी करुन शास्त्रोक्त पद्धतीने शेती करायला हवी.