www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जगदीश शेट्टी यांची निवड झालीय. नवनाथ जगताप यांच्या माघारीने ही निवड बिनविरोध झाली. शेट्टी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसंच शहराध्यक्ष आझम पानसरे यांच्या गटातले मानले जातात. शेट्टी यांना राष्ट्रवादीच्याच आमदारांचा विरोध असल्यानं निवडीत चुरस होण्याची शक्यता होती. मात्र जगताप यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं शेट्टी यांचा मार्ग सुकर झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अखेरच्या क्षणी जगदीश शेट्टी यांची बिनविरोध निवड झालीये. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आझम पानसरे यांचा गट विरुद्ध आमदारांचा गट अशी लढाई या निवडणुकीच्या निमित्तानं पहायला मिळाली. ही निवडणूक शहराच्या राजकारणावर दूरगामी परीणाम करणारी ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असणारे जगदीश शेट्टी यांची अध्यक्षपदी निवड होऊ नये यासाठी तीनही आमदार एकत्र आले होते.
पिंपरी-चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असला तरी शहरावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आझम पानसरे आणि विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे या तीन आमदारांचा दबदबा आहे. ही सर्व मंडळी शहरावर आपला प्रभाव रहाण्यासाठी पालिकेच्या विविध पदांवर त्यांच्या गटाची व्यक्ती बसवण्याचा प्रयत्न करतात.
पालिकेच्या आर्थिक नाड्या हातात असणारं स्थायी समितीचं अध्यक्षपद आपल्याच गटाकडं रहावं यासाठी चुरस होती. पानसरेंच्या गटातल्या जगदीश शेट्टी यांना अध्यक्षपद मिळू नये, यासाठी तीनही आमदारांनी मोर्चेबांधणी केली होती. शेट्टींना विरोध करत नवख्या नवनाथ जगताप यांना पाठींबा दिला. पण अजितदादांनी जगदीश शेट्टी यांच्याय नावाला पसंती देत आमदारांचे मनसुबे धुळीस मिळविले.
शेट्टी यांचा पिंपरी विधानसभा मतदार संघावर डोळा आहे. त्यामुळेच आमदार अण्णा बनसोडे हे शेट्टींना विरोध करतायेत. लांडे, जगताप यांनाही पानसरेंचं वर्चस्व वाढू द्यायचं नाही. बनसोडेंना शेट्टी हे समर्थ पर्याय बनलेत. त्याशिवाय आमदार विलास लांडे यांच्या पत्नी महापौर मोहिनी लांडे यांचंही महत्व कमी झालंय. त्यामुळेच या निवडणुकीच्या माध्यमातनं पानसरे गटानं जगतापांवर कुरघोडी केल्याचं मानलं जातंय. वरकरणी ही स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक दिसत असली तरी शहराच्या राजकारणावर दूरगामी परीणाम करणारी ठरणार आहे.