महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमधल्या पवना पाईपलाईनचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हं आहेत. या पाईपलाईनला विरोध करताना तीन शेतकऱ्यांना प्राणही गमवावा लागला होता.
त्यानंतर राज्य सरकारनं ही योजना थांबवली पण आता या योजनेसाठी सत्तर कोटींचा निधी मंजूर झालाय. पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंद पाईपलाईनमधून पाणी आणण्याची महापालिकेची योजना आहे. पण मावळमधल्या शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध केला. त्याच गोळीबारात तीन शेतकऱ्यांना प्राणही गमवावे लागले. शेतकऱ्यांची ही जखम अजून पुरती भरली नाही, तोच, याच योजनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला सत्तर कोटींचा निधी मिळालाय. हा निधी म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. एवढा गंभीर प्रश्न असताना सत्ताधारी या विषयावर चर्चाही करत नसल्याचा आरोप होतोय.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं ही योजना आवश्यक असल्याचं सांगत विरोधकांवर टीका केलीय. तर पाणी हवं पण ते शेतकऱ्यांच्या जीवावर बेतून नको, अशी भूमिका सामान्य नागरिकांची आहे.
बंद पाईपलाईन योजनेचा विरोध करताना मावळमधल्या शेतक-यांनी पवनेचं पाणी अक्षरशः पेटवलं. त्याची धग पुरती कमी झालेली नाही, तेवढ्यातच आता पुन्हा हा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.