पुण्यात काँग्रेसची राष्ट्रवादीला गुगली....

पुणे महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येत आहेत.

Updated: Feb 26, 2012, 07:58 PM IST

www.24taas.com, पुणे

पुणे महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येत आहेत.

 

सत्तास्थापनेसाठी दोन्ही काँग्रेसची पहिली बैठक पार पडली. मात्र काँग्रेसने महापौरपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद अशी महत्वाची पदे मागून राष्ट्रवादीला पेचात टाकलं आहे. तर राष्ट्रवादी या दोन्ही पदासंह शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावर ठाम आहे. त्यामुळे बैठक पार पडली असली तरी अंतिम तोडगा निघू शकलेला नाही.

 

 

पुण्यात काँग्रसेच्या पदरात २८ जागा पडल्या तर राष्ट्रवादीने ५१ जागांवर विजय मिळवत महापालिकेत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळेच सत्ता वाटपात महापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार हे स्पष्ट आहे. निवडणुकीच्या निकालांमध्ये मागे पडलेल्या काँग्रेसने चर्चेच्या पहिल्या फेरीत मात्र राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीकडे काँग्रेसपेक्षा जवळपास दुप्पट जागा आहेत. याच्या नेमकी उलटी स्थिती २०२० मध्ये होती. तेव्हा काँग्रेसने सर्वात जास्त जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण मंडाळाचे अध्यक्ष अशी सर्व पदे काँग्रेसकडे होती. आता त्यामुळेच राष्ट्रवादी महापौर, स्थायी समिती आणि शिक्षण मंडळा ताब्यात राहावं यासाठी ठाम आहे.

 

 

काँग्रेसला राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेस तडजोड स्वीकारत सत्ता वाटपास तयार होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. चर्चेच्या आणखी काही फेऱ्यांमध्ये आता दोन्हीकडच्या नेत्यांचा कस लागणार आहे.