www.24taas.com, पुणे
पुणेकरांची सुरक्षा राम भरोसे आहे असं म्हणण्याची वेळ आलीय. सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असलेली cctv यंत्रणा निधी अभावी बंद पडलीय. त्याच्या अंमलबजावणीसाठी पैसे द्यायचे कोणी या वादावरून सध्या ही यंत्रणाच बंद आहे.
पुण्यात जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पण या घटनेतूनही कसलाही बोध प्रशासन आणि पोलिसांनी घेतला नसल्याचंच दिसतंय. या घटनेनंतर सामाजिक बांधीलकीचं भान ठेऊन दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं १० लाख, तत्कालीन महापौर मोहन सिंग राजपाल यांनीही १० लाख रुपये देण्याचं मान्य केलं. त्यानंतर जुन्नरकर टेक्नोलॉजीज या कंपनीनं पुण्यातल्या बेलबाग चौक, अलका चौक आणि सेवासदन चौक अशा १४ संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसवले. पण महापालिका आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या दोघांकडून अजूनही पैसे मिळाले नसल्याचं जुन्नरकर टेक्नॉलॉजीनं सांगितलंय. स्वखर्चानं काही काळ सीसीटीव्ही यंत्रणा राबवण्यात आली. पण BSNL चे बिल भरण्यासाठी किंवा इतर खर्चासाठी पैसेच नसल्यानं सध्या ही यंत्रणा बंद आहे.
दुसरीकडं दगडुशेठ हलवाई ट्रस्टनं कॅमे-यासाठी देण्याचे पैसे तयार असल्याचं स्पष्ट केलंय. cctv साठी आवश्यक निधी नसल्याचं पोलीसही मान्य करतायत. पण कॅमे-यासमोर बोलायला ते तयार नाहीत. तर पालिकेनं याआधीच ही जबाबदारी ढकलून दिलीय.