पुण्यातील उच्चशिक्षित बंटी-बबली गजाआड!

पुण्यामध्ये उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू असणाऱ्या एका बंटी आणि बबलीनं सोन्याच्या कॅडबरीचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातलाय... याविरोधात संपूर्ण दातार कुटुंबियावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Updated: Dec 18, 2011, 06:28 PM IST

नितीन पाटोळे, झी २४ तास, पुणे  

 

पुण्यामध्ये उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू असणाऱ्या एका बंटी आणि बबलीनं सोन्याच्या कॅडबरीचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातलाय... याविरोधात संपूर्ण दातार कुटुंबियावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

अद्वैत आणि नीलिमा दातार या उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू दांम्पत्यानं पुण्यातील प्रसिद्ध पु. ना. गाडगीळ सराफी पेढीसह अनेकांना गंडा घातलाय. सोन्याची कॅडबरी तसंच चांदीची वीट देतो किंवा गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देतो या शब्दांवर विश्वास ठेवून पुणे, कोल्हापूरमधील अनेकांनी आपली आयुष्यभराची पुंजी दातार दाम्पत्याकडे सोपवली खरी, मात्र या सर्वांना फसवून त्या दोघांनीही पोबारा केलाय.

 

 

 आपल्या पैशांच्या वसुलीसाठी अनेक गुंतवणूकदारांनी या दांम्पत्याच्या घऱात ठिय्या मांडला असून एकानं संपूर्ण दातार कुटुंबियाविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

 

 

दातार उच्च शिक्षित आहेत आणि उच्चभ्रू देखील. तसंच त्यांच्याकडून फसवले गेलेले गुंतवणूकदार देखील सुशिक्षित आहेत. त्यामुळं पैशांच्या आमिषाला सुशिक्षित वर्गही कसा बळी पडतो आणि स्वत:ची फसवणूक करून घेतो याचं हे डोळे उघडणारं उदाहरण... त्यामुळं पुणेकरांनो अशा बंटी-बबलीपासून सावधान!