www.24taas.com, पुणे
पुण्यातला शुभम शिर्के याचा त्याच्या मित्रांनीच खून केला होता. या घटनेला आता दीड महिना उलटला. शुभमनं दहावीची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल आला. शुभमला ८३ टक्के मिळाले आहेत. पण त्याचा आनंद साजरा करण्यासाठी शुभमच या जगात नाही.
शुभम महादेव शिर्के याचं कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी दहावीपासूनच त्यानं जोरात अभ्यासाला सुरुवात केली. शुभमला दहीवाच्या परीक्षेत ८३ टक्के मार्क मिळाले. पण शुभमचं कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचं स्वप्न अर्ध्यावरच संपलंय. १ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेनं संपूर्ण शिर्के कुटुंबाचंच आयुष्य उध्वस्त झालंय.
शुभम शिर्केच्या मित्रांनीच त्याची खंडणीसाठी हत्या केली. शुभमला खेळण्यासाठी घराबाहेर नेऊन त्यांनी शुभमला जीवे मारलं. या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. त्यांना कदाचित कठोर शिक्षा होईल. पण शुभम आता कधीच परत येणार नाही. त्याच्या आठवणीनं सगळेच व्याकूळ आहेत. त्याचा निकाल हाती आला तेव्हा त्याच्या घरच्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते...