सावधान! येथे रुग्णांना मिळतं 'बुरशी'युक्त सलाइन

रुग्णालयामध्ये खरं तर प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी दाखल केलं जातं. पण रुग्णालयांमधली औषधंच घातक असतील तर रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः खेळ होतो. अशीच एक घटना पुण्याच्या खडकीमधल्या cantonment हॉस्पिटलमध्ये घडली आहे.

Updated: Jun 14, 2012, 05:39 PM IST

www.24taas.com, पुणे

रुग्णालयामध्ये खरं तर प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी दाखल केलं जातं. पण रुग्णालयांमधली औषधंच घातक असतील तर  रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः खेळ होतो. अशीच एक घटना पुण्याच्या खडकीमधल्या cantonment हॉस्पिटलमध्ये घडली आहे.

निर्लाईट -पी हे सलाईन छोट्या मुलांना दिलं जातं. पुण्यामध्ये खडकी कँटोन्मेंट  बोर्डाच्या हॉस्पिमधल्या स्टॉक सलाईनच्या बाटल्यांमध्ये बुरशी आढळून आली आहे. या ठिकाणी उपचार घेणा-या मुलांना हीच सलाईन्स पुरवली जातात. एक्सपायरी डेट आधीच हे सलाईन खराब झालंय. अशा सलाईनमुळे रुग्ण बरा होणं तर दूरच त्याचा आजार बळावण्याची शक्यताच जास्त आहे. इथल्या नर्सेसनी ही गोष्ट वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. मात्र काही उपयोग झाला नाही. अशा घातक औषधांचा पुरवठा सुरूच आहे.

कँटोन्मेंट  बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधली ही पहिलीच घटना नाही. हॉस्पिटलमध्ये एक्सपायरी डेट उलटून गेलेली औषधं रुग्णांना दिली जात असल्याचं गेल्याच महिन्यात उघडकीस आलं होतं. जे रुग्ण महागड्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकत नाहीत, ते याठिकाणी उपचार घेतात. अशा गोर गरीब रुग्णांच्या आरोग्याची इथल्या प्रशासनाला खरोखरच काळजी आहे का,असा प्रश्न यानिमित्तानं निर्माण झालाय.