कैलास पुरी, www.24taas.com,पुणे
एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या वतीनं १६ मार्चला २० जण एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत गिरीप्रेमींचं पथक शिवरायांचा पुतळा विराजमान करणार आहेत.
पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेंच्या एव्हरेस्ट मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी पुण्याच्या शनिवार वाड्याच्या प्रांगणात ढोल ताशांच्या गजरात थिरकणारे हे असंख्य पुणेकर जमले होते. गिरीप्रेमी संस्थेचे २० गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी येत्या १६ तारखेला पुण्याहून रवाना होत आहेत. तमाम शिवप्रेमींना अभिमान वाटावा अशी कामगिरी ते या मोहिमेअंतर्गत करणार आहेत. गिरीप्रेमी संस्थेचं हे पथक शिवरायांचा पुतळा एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर विराजमान करणार आहेत. बाबासाहेब पुरंदरेंनीही या उपक्रमाचं कौतूक केलं आहे.
असंख्य गिरीप्रेमींना शिवाजी महाराजांची ही मूर्ती प्रेरणा देणार यात शंका नाही. ही मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी आणि जगातलं सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टला सर करण्यासाठी निघालेल्या वीरांना झी २४ तासकडूनही लाख लाख शुभेच्छा !