www.24taas.com, पुणे
पुण्यातील संतोष संतोष मानेच्या नातेवाईकांनी तो मनोरुग्ण असल्याचा दावा केला असला तरी एसटीच्या अधिकाऱ्यांनी मात्र संतोष मनोरुग्ण नसल्याचं म्हंटलं आहे. एसटीचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली. तसं असतं तर त्याला सेवेत घेतलं नसतं, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
पुण्यात हैदोस घालणाऱ्या माथेफिरू होता की नाही यावर मतभेद सुरू आहेत. त्यामुळे हा माथेफिरू नक्की कोण आहे हे पाहूया. माथेफिरुचे पूर्ण नाव संतोष मारुती माने आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या कैठाळे गावचा तो रहिवासी आहे. १९७१ चा जन्म असलेल्या मानेचे वय ४१ वर्ष आहे. तो स्वारगेट बस डेपोत २००९ मध्ये भरती झाला. एसटीमध्ये तो कायमस्वरुपी ड्रायव्हर होता. त्याचा लायसन्स नंबर ४१७० आहे. मानेचे आत्तापर्यंतचे कामाचे रेकॉर्ड चांगले असल्याचं बोललं जातं आहे. माने काल रात्री साडेसात वाजता स्वारगेटला गाणगापूर-पुणे एसटी घेऊन आला होता. सध्या पुण्यात एसटीच्या रेस्ट हाउसमध्ये तो रहात होता. माने आज सकाळी ड्युटी नसताना आला होता. सातारा-स्वारगेट-सातारा ही बस त्यानं ताब्यात घेतली.
संतोष माने हा मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येते आहे. काही काळापूर्वी त्यानं मानसिक स्थितीवर उपचार घेतले होते. त्यानंतर तो बरा झाला होता. संतोष माने मनोरुग्ण असल्याची माहिती त्याच्या नातेवाईंकांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी मानेनं मानसिक उपचारांसाठी दोन महिन्यांची सुट्टी घेतली होती अशी माहिती त्याच्या भावानं दिली आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी मानेच्या सोलापुरा मधल्या घरी पोलीस रवाना झाले आहेत. संतोष मानेच्या आजारासंदर्भातल्या रिपोर्टस तपासण्याचं काम सुरू आहे.