www.24taas.com, उस्माबाद
सीना कोळेगाव धऱणाचं पाणी अन्य भागांना सोडू नये असे आदेश गुरुवारी हायकोर्टानंही दिलेत.उस्माबादमधल्या शेतक-यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं हा आदेश दिला.
उस्मानाबादच्या सीना कोळेगाव प्रकल्पातून सोलापूरला पाणी सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. पण पिण्यासाठी सोडलेले पाणी शेतीसाठी वापरलं जात असल्याचं उघड झाल्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. हायकोर्टानं ही स्थगिती कायम ठेवली आहे.
सोलापूरला पाणी देण्यास उस्मानाबादमधल्या शेतक-यांचा विरोध होता. त्यातच पिण्याचे पाणी शेतीसाठी वापरल्यानं उस्मानाबादचे नेते आणि शेतकरी संतप्त झाले होते. हायकोर्टात त्यांनी हे प्रकरण नेले. हायकोर्टानं सीना कोळेगाव धरणातून १५ जूनपर्यंत इतर भागांना पाणी सोडण्यास मनाई केली आहे.
धरणग्रस्तांच्या व्यथांवरूनही कोर्टानं सरकारला फटकारले. परांडा आणि करमाळ्यातील धरणग्रस्तांसाठी काय उपाययोजना केल्या याची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्या असे आदेशही कोर्टानं दिले.या प्रकरणात पाण्याचा अपव्यय होत असून पिण्याच्या नावाखाली शेतीला पाणी देण्याचा राजकीय खेळ असल्याची जळजळीत टीपण्णी हायकोर्टानं केली.