नेरूळ उरण रेल्वे मार्ग रुळावर

नेरुळ-बेलापूर-उरण रेल्वे मार्ग येत्या चार वर्षात पूर्णत्वाला जाण्याची शक्यता असल्याचं सिडकोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नेरुळ बेलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या सीवूडस स्थानकामार्गे हा रेल्वे मार्ग उरणच्या दिशेने जाईल. सीवूडस आणि द्रोणागिरी येथील रस्त्यावरील पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Updated: Nov 5, 2011, 01:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

नेरुळ-बेलापूर-उरण रेल्वे मार्ग येत्या चार वर्षात पूर्णत्वाला जाण्याची शक्यता असल्याचं सिडकोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नेरुळ बेलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या सीवूडस स्थानकामार्गे हा रेल्वे मार्ग उरणच्या दिशेने जाईल. सीवूडस आणि द्रोणागिरी येथील रस्त्यावरील पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सीवूड रेल्वे स्थानकातून निघणारा हा मार्ग जवळच असलेल्या बेलापूर मार्गे सागरसांगा, तारघर, बामनडोंगरी, खारकोपर, गवान, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी मार्गे उरणला पोहचेल.

 

जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट, न्हावा शेवा तसंच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या या महत्वाच्या अशा या २७ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या कामाला खरतरं १९९६-९७ साली चालना देण्यात आली होती. पण त्यानंतर या रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम रखडले. रेल्वे मंत्रालय आणि सिडको संयुक्तपणे या मार्गाची उभारणी करत आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीचा अंदाजित खर्च १९९६-९७ मध्ये ४९५.४९ कोटी रुपये होता तो गेल्या पंधरा वर्षात १४१२.१७ कोटी रुपयांवर जाऊन पोहचला आहे. सिडकोला यात ९४६ कोटी रुपयांचा वाटा उचलावा लागणार आहे. या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी रेल्वे, सिडको आणि महाराष्ट्री राज्य सरकार यांच्यात यंदाच्या जुलै महिन्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला.