www.24taas.com, सॅन फ्रान्सिसको
ऍपलने शार्पर स्क्रीन आणि वेगवान प्रोसेसर या नव्या फिचर्ससह नवं आयपॅडचं मॉडेल लाँच केलं असल्याच्या वृत्ताला कंपनीने दुजोरा दिला आहे. ऍपलने दिलेल्या माहितीनुसार नवा डिसप्ले हा हाय डेफिनेशन टेलिव्हिजन सेट पेक्षा अधिक शार्प असेल. तसंच आधीच्या मॉडेल्स पेक्षा अधिक रंगसंगती त्यावर दिसू शकतील.
नवा आयपॅड नव्या चीपसह उपलब्ध करुन देण्यात आला आहे त्यामुळे ग्राफिक्सचा वापर परिणामकारकरित्या करता येणार आहे. सॅनफ्रॅन्सिसको इथे लँच करतेवेळी ऍपलचे सीईओ टिम कूक म्हणाले की नवा ऍपल हा नवी उंची गाठेल आणि आधीच्या आयपॅडपेक्षा तो कितीतरी पटीने सरस असेल. कूक यांच्या मते पीसीच्या नंतर कालखंड हा आयपॅड आणि इतर ऍपल उत्पादनांच्या वर्चस्वाचा असेल.
अमेरिकेत हे नवे मॉडेल मार्च १६ पासून बाजारपेठेत उपलब्ध होईल. आधीच्या आयपॅड २ च्या तुलनेत नव्या मॉडेलमध्ये पाठीमागच्य बाजूस हाय रेझोल्युशन कॅमेराचं फिचर आहे जे आयफोन 4S च्या तोडीसतोड असेल. नव्या मॉडेलमध्ये वेरिझॉन वायरलेसचा आणि एटी अँड टी इनकॉर्पोरेशनच्या एलटीई वायरलेस ब्रॉडबँड नेटवर्कचाही वापर करता येणार आहे. यामुळे आधीच्या आयपॅड आणि आयफोनपेक्षा अधिक वेगाने थ्रीजी चा वापर करता येईल.
नव्या मॉडेलचा वापर करणाऱ्यांना मुव्हिज (सिनेमा) स्टोअर करण्यासाठी आयक्लाऊडच्या रिमोट स्टोरेज सर्व्हिसची सूविधा ऍपल उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे इंटरनेटद्वारा ते डाऊनलोडही करता येतील. सध्या फोटो, म्युझिक आणि डॉक्युमेंटस स्टोअर करण्याची सूविधा त्यात आहे. अमेरिकेत त्याची किंमत ४९९ डॉलर्सपासून ते ८२९ डॉलर्स पर्यंत राहील. सेल्युलर नेटवर्कचा वापर करता येणाऱ्या मॉडेल्सची किंमत ६२९ अमेरिकन डॉलर्स ते ८२९ अमेरिकन डॉलर्स दरम्यान राहील.