फेसबुकचा फोटो खराब.. तर नोकरी गमवाल

आपला फेसबुकवरील फोटो हा अतिशय आकर्षक असला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकजण आपण फेसबुकवर किती चांगले दिसू यासाठी अट्टाहास करीत असतो.

Updated: Jul 26, 2012, 05:01 PM IST

www.24taas.com, लंडन

 

आपला फेसबुकवरील फोटो हा अतिशय आकर्षक असला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकजण आपण फेसबुकवर किती चांगले दिसू यासाठी अट्टाहास करीत असतो. आणि त्यामुळे फेसबुकवर आपला चांगला प्रोफाईल फोटो टाकत असतो. मात्र आता तुमचा प्रोफाईल फोटोच चांगला नसेल तर तुमच्या नोकरीवर मात्र गदा येऊ शकते. असे एका संशोधनाच्या निष्कर्षातून पुढे आले आहे.

 

फेसबुकवरील आपला प्रोफाइल कसाही तयार करून जमणार नाही. यापुढे त्यावर अधिक कटाक्षाने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण कंपनी किंवा नोकरी देणारी मंडळी तुमच्या प्रोफाइलला केवळ औपचारिकता मानत नाहीत. ते प्रोफाइलवरून तुमची जीवनशैली, दृष्टिकोन अशा प्रकारे एकूण व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यात फोटोलाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी या गोष्टींची खबरदारी घेण्याचा सल्ला संशोधनातून देण्यात आला आहे.

 

संशोधनासाठी चमूने माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, कायदा अंमलबजावणीत, अन्न व पेय, परिवहन, जाहिरात या क्षेत्रांतील प्रतिनिधींच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातून त्यांना सध्याचा ट्रेंड लक्षात आला. आता उमेदवारांच्या मुलाखतीसाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंगचा वापर करावा का, हा नैतिकदृष्ट्या वादाचा विषय ठरेल, असेही संशोधन अहवालात म्हटले आहे. व्यक्तिमत्त्वाच्या आत डोकावण्यासाठी फेसबुकवरील त्याच्या हालचाली महत्त्वाच्या ठरू शकतात, असे एम्प्लॉयर्सना वाटते. दुसरीकडे भरती करताना अमेरिकेतील अनेक कंपन्या सोशल नेटवर्किंगची मदत घेऊ लागल्या आहेत, असे फेसबुकने अगोदरच स्पष्ट केले आहे.