India Vs Bangladesh 2nd Test In Kanpur: कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील अंतिम कसोटी रंजक स्थितीमध्ये पोहोचली आहे. कसोटीचा पहिला अर्ध्याहून अधिक दिवस आणि पुढील दोन दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का दिला. भारताने चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर बांगलादेशला 233 वर बाद केलं. त्यानंतर सलामीवीर यशसवी जयसवाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी टी-20 स्टाइल फलंदाजी करत बेझबॉल क्रिकेटचा नजराणा चाहत्यांसाठी सादर केला.
रोहित आणि जयसवालने कसोटीमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम भारताच्या नावावर केला. चहापानापर्यंत भारतीय संघाची स्थिती 2 बाद 138 अशी होती. या कसोटीमधील अडीच दिवसांचा खेळ वाया गेल्याने कसोटी अनिर्णित राहील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. खरं तर हा सामना अनिर्णित राहिला तरी भारत सलग तिसऱ्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहण्याची आपली दावेदारी अधिक मजबूत करेल असं समीकरणं आहे. मात्र असं असतानाच चौथ्या दिवसाचा खेळ पाहिल्यास भारतीय संघाला या कसोटीमधून निकाल अपेक्षित असल्याचं स्पष्ट होतं आहे.
चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने बांगलादेशचा संपूर्ण डाव 233 वर गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रोहित आणि जयसवालने टी-20 स्टाइल फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. भारताने अवघ्या 18 बॉलमध्ये धावफलकावर अर्धशतक झळकावलं. तर शतक झळकावण्यासाठी संघाला 61 चेंडू लागले. याचदरम्यान रोहित शर्मा 11 बॉल 23 आणि जयसवाल 51 बॉलमध्ये 72 धावा करुन तंबूत परतले. धावांचा वेग आणि सामन्याची स्थिती पाहता सामान्यपणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या विराट कोहलीने मैदानात येऊन धावगती कायम राखणे किंवा वाढवणे अपेक्षित होते. मात्र त्यामध्ये बदल करत विराटऐवजी ऋषभ पंतचा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. मात्र या निर्णयावर कॉमेंट्री करणारे माजी कर्णधार सुनील गावसकर चांगलेच संतापले. या मागे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्माने काय तर्क लावलंय हे कळण्यास मार्ग नसल्याचा टोला गावसकरांनी लगावला.
नक्की वाचा >> IPL 2025 मध्ये रोहित शर्मा RCB चा कॅप्टन? विराटच्या टीमचा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार?
गावसकरांबरोबर कॉमेंट्री करणाऱ्या मुरली कार्तिकने मैदानात उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा फलंदाज अपेक्षित असेल असं मत व्यक्त करत या कारणामुळेच पंतला वरच्या क्रमांकावर पाठवलं असेल अशी शक्यता व्यक्त केली. मात्र गावसकरांनी हा निर्णय आश्चर्यचकित करणारा असल्याचं म्हटलं. "तुम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलताय ज्याने चौथ्या क्रमांकावर खेळत कसोटीमध्ये जवळपास 9 हजार धावा केल्या आहेत," असं म्हणत गावसकरांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
खरं तर यापूर्वीही अनेकदा कोहलीच्या आधी डावखुऱ्या फलंदाजांना गरजेनुसार वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आलं आहे. मागील वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इशान किशनला कोहलीच्या आधी पाठवण्यात आलं होतं. त्यावेळेस पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात खेळताना किशनने आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. त्याच्या एक वर्ष आधी मिरपूरच्या कसोटीमध्ये बांगलादेशविरुद्ध अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर आणि कोहलीच्या आधी फलंदाजीसाठी पाठवण्यात आलेलं.