झी २४ तास वेब टीम, मुंबई
अकरा नोव्हेंबर दोनहजार अकरा. शतकातून एकदाच येणारी ही तारीख. ग्लोबलायझेशनच्या युगात सेलिब्रेट करायला मिळालेला एका दिवसाचा नवा उत्सव. कारण हा दिवस आहे अकरा अकरा अकरा. हा दिवस आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी अनेकानी प्रयत्न सुरु केलेतं. खरतर बाळ जन्माला येण्याची तारीख तशीही कोणी विसरत नाहीचं. आणि त्यातही ताऱीख ती अकरा अकरा अकरा असेल तर मग क्या बात है.
मुंबईच्या रहिवासी निधी सारंग अंधेरी परिसरात असलेल्या डॉक्टर सुजाता वाघ यांच्या दवाखान्यात नियमीत तपासणीसाठी आल्या होत्या. निधी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नव्हता. त्यामागचं कारणही तसचं आहे. निधी लवकरच आई होणार आहेत. पण त्यांच्या आनंदामागचं केवळ हे एकमेव कारण नाही तर ११ नोव्हेंबर २०११ अर्थात ११.११.११ चा मुहूर्त त्यांना साधायचा. आपलं बाळ या दिवशी जन्माला यावं यासाठी निधी सारंग यांचा आग्रह आहे. ११.११.११ चा मुहूर्त साधण्याची जबाबदारी त्यांनी डॉक्टर सुजाता वाघ यांच्यावर टाकली आहे. निधी सारंग यांचा ज्योतिष्यावर गाढ विश्वास आहे. मुहूर्तावर बाळ जन्माला आल्यास त्या बाळासाठी तो दिवस शुभ असेल असं त्यांच्या ज्योतिषाने त्यांना सांगितलं. आणि त्यामुळेच निधी यांनी डॉक्टरांकडं याच दिवशी डिलिव्हरी करण्याचा आग्रह धरला आहे.
खरंतर निसर्ग नियमाप्रमाणे महिलेची प्रसुती होते. आणि तो दिवस बाळासाठी चांगला असतो. त्याप्रमाणे डॉक्टरांनी निधी यांच्या डिलेव्हरीची तारीख 15 नोव्हेंबर सांगितली आहे. या मुहूर्तावर बाळ जन्माला यावं अशी केवळ निधी यांचीच इच्छा आहे असं नाही तर त्यांच्या प्रमाणेच अनेकांनी डॉक्टरांना यासाठी गळ घातली. तो मुहूर्त साधण्यासाठी आता डॉक्टरही तयारीला लागले आहेत.