नारंगने साधला 'नेम', बिंद्राने घालवला 'गेम'

गोल्डन बॉय अभिनव बिंद्रा यांने भारतीयांची निराशा केली आहे. अभिनवचे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचाच दुसरा नेमबाज गगन नारंग याने पात्रता फेरीत यश मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.,

Updated: Jul 30, 2012, 04:11 PM IST

www.24taas.com, लंडन

 

गोल्डन बॉय अभिनव बिंद्रा यांने भारतीयांची  निराशा केली आहे. अभिनवचे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचाच दुसरा नेमबाज गगन नारंग याने पात्रता फेरीत यश मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बिंद्रा याने याच प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा बिंद्रा यांच्याकडेच होत्या. पात्रता फेरीमध्ये नारंग आणि बिंद्रा यांच्यात जोरदार टक्कर झाली.

 

परदेशात विशेष ट्रेनिंग घेतल्यानंतर आपला नेम अधिक अचूक झाल्याचे बिंद्राने म्हटले होते. मात्र, पात्रता फेरीचे आव्हान पेलण्यातच तो अपयशी ठरला. नवी दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये याच प्रकारात नारंग याने सुवर्ण पदक जिंकले होते. त्यामुळे आता अंतिम फेरीत नारंग कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

 

शूटिंग बरोबरच इतर काही क्रीडाप्रकारांकडे भारतीयांचे लक्ष आज राहणार आहे. हॉकीत भारताचा मुकाबला नेदरलॅंडबरोबर रात्री साडेआठ वाजता होणार आहे. रात्री साडेदहा वाजता साईना नेहवालची मॅच आहे. बॉक्सिंगमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता सुमित सांगवान ८१ किलो गटात आपली ताकद आजमावणार आहे.

 

[jwplayer mediaid="147883"]